Duleep Trophy 2025 Final: आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाने सर्वांना चकित करणाऱ्या रजत पाटीदारने (Rajat Patidar) आता पुन्हा एकदा कॅप्टन म्हणून आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सेंट्रल झोनने प्रतिष्ठेच्या दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये साऊथ झोनचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.
या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे यश राठोड (Yash Rathod), ज्याने 194 धावांची मॅरेथॉन खेळी केली.या विजयामुळे रजत पाटीदारच्या कॅप्टन्सीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला (RCB) नवी दिशा दिल्यानंतर आता त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील ही महत्त्वाची ट्रॉफी जिंकून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.
सेंट्रल झोनचा ‘विराट’ विजय
बंगळूरुच्या बीसीसीआई सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या फायनल सामन्यात सुरुवातीपासूनच सेंट्रल झोनचे वर्चस्व पाहायला मिळालं. फिरकीपटू सारांश जैन (5 विकेट्स) आणि कुमार कार्तिकेय (4 विकेट्स) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर साऊथ झोनचा पहिला डाव अवघ्या 149 धावांवर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पहिल्याच दिवशी सेंट्रल झोनने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती.
या दमदार कामगिरीनंतर फलंदाजांनी विजयाचा पाया रचला. सेंट्रल झोनने आपल्या पहिल्या डावात तब्बल 511 धावांचा डोंगर उभारला. यात कॅप्टन रजत पाटीदारने 101 धावांची शानदार शतकी खेळी केली, तर दुसरीकडे यश राठोडने 194 धावांची वादळी खेळी करत साऊथ झोनच्या गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले.
अष्टपैलू सारांश जैनने फलंदाजीतही चमक दाखवत 69 धावांचे मोलाचे योगदान दिले, तर सलामीवीर दानिश मालेवारने 53 धावांची खेळी केली.
साऊथ झोनचा संघर्ष ठरला अपयशी
पहिल्या डावात मोठी पिछाडीवर पडल्यानंतर साऊथ झोनने दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. अंकित शर्मा (99) आणि आंद्रे सिद्धार्थ (84) यांच्या झुंजार खेळीमुळे त्यांनी 426 धावांपर्यंत मजल मारली आणि सेंट्रल झोनसमोर विजयासाठी 65 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले.
हे किरकोळ लक्ष्य गाठताना सेंट्रल झोनने 4 विकेट्स गमावल्या, पण अखेरीस सामना सहज जिंकून दुलीप ट्रॉफी 2025 वर आपले नाव कोरले.
यश राठोड ठरला विजयाचा ‘हीरो’
या सामन्यात रजत पाटीदारच्या शतकाची आणि कॅप्टन्सीची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा झाली ती यश राठोडच्या 194 धावांच्या अविस्मरणीय खेळीची. अवघ्या 6 धावांसाठी त्याचे द्विशतक हुकले, पण त्याच्या या खेळीनेच सेंट्रल झोनच्या विजयाचा मार्ग निश्चित केला होता. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळेच सेंट्रल झोनला पहिल्या डावात 362 धावांची मोठी आघाडी मिळाली, जी सामन्यात निर्णायक ठरली.

सदाशिव गायकवाड हे मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रावर लेखन करणारे लेखक आहेत. ते वाचकांना सिनेसृष्टीतील घडामोडी, खेळांच्या बातम्या व विश्लेषण रोचक आणि सोप्या पद्धतीने सादर करतात.




