Ativrushti Nuksan Bharpai GR: जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बळीराजाचं कंबरडं मोडलं. तब्बल ३० जिल्ह्यांमधील ४२ लाख एकरवरील पिकं डोळ्यादेखत वाहून गेली.
तेव्हापासून शेतकरी मदतीच्या आशेवर होता. अखेर, सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील मदतीची घोषणा झाली असून, परभणी, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आशेचा किरण घेऊन आला आहे.
‘या’ तीन जिल्ह्यांना मिळाला दिलासा!
शासनाने आज, १८ सप्टेंबर २०२५ रोजी, एक मोठा निर्णय घेत परभणी, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल १३६ कोटी ३ लाख १९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे एकूण २,५२,१४७ शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलणार आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर, नागपूर विभाग आणि कोकणातील काही जिल्ह्यांना मदत जाहीर झाली होती. आता दुसऱ्या टप्प्यात या तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्याला सर्वाधिक पॅकेज
या मदतीत सिंहाचा वाटा परभणी जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल २,३८,५३० शेतकऱ्यांना १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
- जुलै २०२५: ८७,११७ शेतकऱ्यांना ५१ कोटी ६४ लाख २२ हजार रुपये.
- ऑगस्ट २०२५: १,५१,०४२ शेतकऱ्यांना ७६ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये.
या आकडेवारीवरूनच परभणीत पावसाने किती मोठं नुकसान केलं होतं, याचा अंदाज येतो.
सांगली आणि साताऱ्यालाही आधार
पुणे विभागातील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही शासनाने वाऱ्यावर सोडले नाही.
- सांगली: १३,४७५ शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपये मंजूर.
- सातारा: ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या १४२ शेतकऱ्यांना ३ लाख २३ हजार रुपयांची मदत.
पैसै खात्यात कसे आणि केव्हा येणार?
आता सर्वात मोठा प्रश्न! ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कशी? तर, शासनाचा जीआर (GR) निघाला असला तरी, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी थोडा वेळ लागेल.
पंचनामे पूर्ण झालेल्या भागांमध्ये आता शेतकऱ्यांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया पार पडताच, मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
बाकीच्या जिल्ह्यांचं काय? चिंता करू नका!
राज्यातील ३० जिल्हे बाधित असताना केवळ काही जिल्ह्यांनाच मदत का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर, ज्या-ज्या जिल्ह्यांमधील पंचनामे पूर्ण होत आहेत, तसे-तसे टप्प्याटप्प्याने निधी वितरणाला मंजुरी दिली जात आहे.
त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. लवकरच तुमच्या जिल्ह्यासाठीही असाच जीआर निघेल आणि त्याची सर्वात पहिली बातमी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवू.

योगेश कोल्हे हे व्यवसाय, शेअर बाजार, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील घडामोडी या विषयांवर लेखन करणारे एक उत्साही लेखक आहेत. ते वाचकांना सोप्या व स्पष्ट भाषेत उपयुक्त, माहितीपूर्ण आणि अद्ययावत लेख उपलब्ध करून देतात.




