Mumbai Rain Alert IMD: मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोरदार ‘कमबॅक’ केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस शनिवारपासून पुन्हा सक्रिय झाला असून, रविवारी मध्यरात्रीपासून तर शहरात आणि उपनगरात पावसाने अक्षरशः धु धु धुलाई केली आहे.
आता हवामान खात्याने (IMD) पुढील काही तासांसाठी महत्त्वाचा इशारा दिला असून, मुंबईकरांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई पाऊस अपडेट रात्रीपासून जोरदार पाऊस
शनिवारपासून पावसाची रिपरिप सुरु होती, पण रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाने रौद्ररूप धारण केले. शहरासह उपनगरांत, विशेषतः भायखळा, परळ, कुलाबा, अंधेरी, वांद्रे, आणि घाटकोपर या भागांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली असून, सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पावसाचा हा जोर आणखी वाढणार असून, सोबत मेघगर्जनेचाही अंदाज आहे. त्यामुळे, प्रशासनाने मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
पुढील काही तास क्रुशियल
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम कोकण किनारपट्टी आणि विदर्भात दिसून येत असून, मुंबईतही पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे, तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर एकदा हवामानाचा अंदाज नक्की तपासा!
कुठे किती कोसळला? पाहा रिपोर्ट कार्ड
सोमवारी पहाटे ५:३० पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या विविध भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
- कुलाबा: ८८.२ मिमी
- वांद्रे: ८२ मिमी
- भायखळा: ७३ मिमी
- टाटा पॉवर: ७०.५ मिमी
- जुहू: ४५ मिमी
- सांताक्रूझ: ३६.६ मिमी
या आकडेवारीवरून पावसाचा जोर किती होता, याचा अंदाज येतो.
सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपति! 452 मतांनी विजय, पण कॉंग्रेस म्हणते, खरी हार BJP ची!
मुंबईच नाही, संपूर्ण राज्यात पावसाचा ‘धिंगाणा’
फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीच्या घाट परिसरात तसेच विदर्भातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, या भागांमध्ये प्रवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
पावसाचा परतीचा प्रवास सुरु, पण महाराष्ट्रातून कधी जाणार?
एकीकडे राज्यात पाऊस धुमाकूळ घालत असताना, दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची घोषणा केली आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे.
मग महाराष्ट्रातून पाऊस कधी जाणार? या प्रश्नाचे उत्तर देताना हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेऊ शकतो.
यंदा मान्सूनने २४ मे रोजी केरळमधून देशात आगमन केले होते आणि वेळेआधीच, म्हणजे २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला होता. आता त्याचा परतीचा प्रवास सुरु झाला असला तरी, ‘जाता जाता’ तो महाराष्ट्राला भिजवून काढणार, हे नक्की!

योगेश कोल्हे हे व्यवसाय, शेअर बाजार, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील घडामोडी या विषयांवर लेखन करणारे एक उत्साही लेखक आहेत. ते वाचकांना सोप्या व स्पष्ट भाषेत उपयुक्त, माहितीपूर्ण आणि अद्ययावत लेख उपलब्ध करून देतात.




